चंद्रपूर/
करंजी गावात ‘ग्रामीण लोककला केंद्रा’च्या स्थापनेने झाडीतील सांस्कृतिक क्षेत्रात नवे पर्व सुरू होत आहे. गावपातळीवर सुप्त असलेल्या अनेक हौशी ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना दिशा देण्यासाठी या केंद्राची उभारणी केली जात आहे.
या उपक्रमाचा भूमिपूजन सोहळा वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप व भोजनदान अशा सामाजिक उपक्रमांनी थाटात पार पडला. पत्रुजी पेंढारकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, समीर निमगडे, डॉ. किशोर पेंढारकर, वैष्णवी एल. पेंढारकर, लालू निमगडे, सुखदेव पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे कला केंद्र झाडीतील नवकलावंतांना लेखन, संगीत, नाट्य, लघुपट निर्मिती, दिग्दर्शन यामध्ये प्रशिक्षण देणार असून त्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देणार आहे. पारंपरिक कला, बोलीभाषा, लोकगीत आणि झाडीची संस्कृती यांचे जतन व संवर्धन हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट ठरणार आहे.
ग्रामीण साहित्यावर दुर्लक्ष – समीक्षकांनी झाडीला डावलले!
झाडीपट्टीतील ग्रामीण साहित्याचा अचूक अभ्यास, अभ्यासपूर्ण समीक्षा आणि तितक्याच गांभीर्याने घेतले जाणे आजही दूरची गोष्टच आहे. अध्यक्ष राहुल पेंढारकर म्हणाले, “ग्रामीण साहित्य ७५ वर्षांपासून अस्तित्वात असलं तरी झाडीपट्टीतील साहित्य समीक्षकांच्या केंद्रबिंदूवर कधीच आलं नाही, ही मोठी उपेक्षा आहे. त्यामुळेच हे केंद्र झाडीतील प्रतिभावंतांसाठी उभं करतोय.”
राहुल पेंढारकरांची भावनिक भावना...
“मी मूळचा करंजी गावचा. लहानपणी सातवीत स्कॉलरशिप मिळवली, शिक्षण सुरू होतं, पण ‘आई जन्माची शिदोरी’ या आदिवासी नाटकाने मला कलावंत म्हणून घडवलं. आजही मी शिकतोय, जिवंत आहे, आणि स्ट्रगल करतोय. पण माझ्यासारखे हजारो ग्रामीण कलावंत आपली कला घेऊन पुढे यावेत, त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी हे केंद्र उभं करत आहोत,” असं पेंढारकरांनी ठामपणे सांगितलं.
करंजीतून सुरू होणार झाडीतील नवसंस्कृतीचा लढा!
या उपक्रमामुळे झाडीतील सुप्त कला उलगडण्यास मदत होणार असून करंजी हे झाडीतील एक नवे ‘सांस्कृतिक प्रेरणास्थळ’ ठरणार यात शंका नाही.










